खडक पोलिसांनी दोघांना पकडून जप्त केल्या ६९०० गोळ्या : उत्तर प्रदेशातून कुरिअरने मागवल्या जात होत्या
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : नशेसाठी गुंगीकारक औषधी गोळ्या विकल्या जात असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. उत्तर प्रदेशातून कुरिअरद्वारे या गोळ्या पुण्यात मागवून त्यांची नशेसाठी विक्री करणार्या दोघांना खडक पोलिसांनी पकडले. त्यांच्या स्कुटरच्या डिकीमधून आणि घरातून तब्बल ६ हजार ९०० औषधी गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
समीर हमीद शेख (वय ४०, रा. बुर्ज अल मर्जान, साईबाबानगर, कोंढवा) आणि सुनिल गजानन शर्मा (वय ३४, रा. सुखसागरनगर, साईनगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. खडक पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार आशिष चव्हाण यांना गोपनीय बातमीच्या आधारे माहिती मिळाली.
त्यावरून पोलिसांनी २५ नोव्हेंबर रोजी पहाटे दीड वाजता जेधे चौकात स्कुटरवरून आलेल्या दोघांना पकडले. त्यांच्या स्कुटरच्या डिकीमध्ये नायट्राझेपॅम टॅब्लेट्स, नित्झासेन, अल्प्राझोलम टॅब्लेट्स या अंमली पदार्थांच्या गोळ्या सापडल्या. अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी दोघांच्या घरांची झडती घेतली. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या ६ हजार ९०० गोळ्या सापडल्या.
त्यांच्याकडून १ लाख २० हजार रुपये किमतीची दुचाकी आणि २७ हजार ९५ रुपये किमतीच्या गोळ्या असा एकूण १ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातून ते कुरिअरने या गोळ्या मागवत आणि कोंढवा, काशेवाडी, हडपसर, कॅम्प, येरवडा परिसरात नशेसाठी त्यांची विक्री करत असत. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे अधिक तपास करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, मनोजकुमार लोंढे, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, कुलदीप व्हटकर, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, अजित फरांदे, कृष्णा गायकवाड, अक्षयकुमार वाबळे, आशिष चव्हाण, इरफान नदाफ, विकास पांडोळे, विश्वनाथ गोरे, शुभम केदारी, शोएब शेख, निलेश दिवटे, मयूर काळे, युवराज नाइकरे यांनी केली आहे.


















